भयानक!!! रस्त्यातील खड्ड्यामुळे हादरे बसून रस्त्यातच प्रसूती; खुरपीने नाळ कापण्याची वेळ...

कोल्हापूर: कोल्हापुरातील रस्त्यांची परिस्थिती सांगणे हे कोणाला नवीन नाही. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आलेल्या प्रत्येक पर्यटक आणि नागरिक खराब रस्त्यांमुळे त्रस्त आहे. अशातच या खड्ड्यातील रस्त्यांमधून जाताना एका गर्भवती महिलेला हादरे बसून अचानक कळ येण्यास सुरुवात झाली आणि रस्त्यातच प्रसूती झाल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. सुदैवाने बाळाची आणि आईची तब्येत बरी असून दोघेही सुखरूप आहेत. ही घटना निपाणी मुरगुड रोडवरील यमगे गावाजवळ घडली आहे. सदर कुटुंबीय मध्य प्रदेश येथून ऊस तोडणीकामगार म्हणून आले असून खराब रस्त्यांमुळे प्रसुती काळा सुरू झाल्याने रस्त्यातच सदर महिलेने बाळाला जन्म दिला. दरम्यान रुग्णालय जवळ नसल्याने बाळाची नाळ खुरप्याने कापावी लागली. आणि नंतर मुरगुडच्या ग्रामीण रुग्णालयात बाळ आणि बाळंतिणीला दाखल करण्यात आले.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच महानगरपालिकेतील एका अभियंताच्या आईचा रस्त्याच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच काल अशाच रस्त्यांच्या खड्ड्यामध्ये हादरे बसून एका गर्भवतीला अचानक प्रसूतीच्या कळा सुरू झाल्याने रस्त्यातच प्रसूती झाली आहे. किरण केसू पालवी राहणार खारी,तालुका खालवा ,जिल्हा खांडवा ,मध्य प्रदेश असे प्रसूती झालेल्या महिलेचे नाव आहे. पालवी दाम्पत्य गेल्या काही महिन्यांपासून रयत साखर कारखान्याकडे ऊस तोडणी मजूर म्हणून काम करत आहे. त्यांच्यासोबत एकूण 32 जण असून ते सध्या कासेगाव येथे वास्तव्यास आहेत. काल तीन मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास भुदरगड तालुक्यातील तिरवडे च्या दिशेने ट्रॅक्टर मधून ही सर्व मंडळी निघाली होती. रस्ता अत्यंत खराब असल्यामुळे प्रचंड हादरे बसत होते. या हादरांमुळे किरण पालवी यांना पोटात दुखण्यास सुरुवात झाली तसेच प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या. 
दरम्यान महिलेला त्रास होत असल्याचे बघून ट्रॅक्टर मालक सुरज नांदेकर यांनी 108 डायल करत रुग्णवाहिका मागवली मात्र खराब रस्त्या असल्यामुळे रुग्णवाहिका येण्यास विलंब होत होता. दरम्यान रुग्णवाहिका दाखल होण्यापूर्वीच रस्त्याच्या कडेला शेतामध्ये काही महिलांनी साडीच्या साहाय्याने अडोसा निर्माण करत सदर महिलेची प्रसूती केली तर सदर महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला.यात अत्यंत भीषण अवस्था म्हणजे मेडिकल सुविधा नसल्याने टोळीतील लोकांना बाळाची नाळ खुरप्याने कापावी लागली. यानंतर यमगे गावातील आशा स्वयंसेविकांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत महिलेला आणि बाळाला येथील प्राथमिक उपचार केद्रात हलवले. तर डॉ. रुपाली लोकरे, आशासेविका सरिता एकल, सुनीता पाटील, सुनीता कांबळे यांनी धाव घेऊन उपचार केले. नंतर त्यांना रुग्णवाहिकेतून तात्काळ मुरगूडच्या ग्रामीण रुग्णालयात नेले. सध्या या दोघांवर इथे अधिक उपचार सुरु असून बाळ आणि आई सुरक्षित आहेत. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील रस्ते किती भीषण परिस्थितीमध्ये आहे. हे या घटनेवरून दिसून येत आहे. रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच समजत नसून शहराच्या रस्त्यासह राज्यमार्गाचे देखील प्रचंड दुरावस्था झाली आहे.

Post a Comment

0 Comments