कोल्हापूर: शिवसेना ठाकरे गटाचे मुलुख मैदानी तो संजय राऊत हे गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान ते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय सभा आणि कार्यक्रमांसोबतच प्रमुख लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात गेलेले माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू डॉक्टर चेतन नरके यांच्या घरी जाऊन संजय राऊत यांनी भेट घेतली या भेटीमुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आले असून डॉक्टर चेतन नरके आगामी निवडणुकीत चंद्रदीप नरके यांच्या विरोधात योग्य पर्याय असतील का याची चाचपणी होत आहे.
शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर अनेक ठिकाणी राजकीय समीकरण बदलले आहेत. कोल्हापूर च्या करवीर मतदार संघातील शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी काही दिवसांपूर्वीच शिंदे सोबत जात आगामी निवडणुका मी धनुष्यबाण चिन्हावर लढवणार असल्याचे जाहीर केले. यानंतर करवीर मतदारसंघातील आजवर चंद्रदीप नरके यांना पाठींबा दिलेल्या शिवसैनिकांचा राग उफाळून आला असून हा राग संजय राऊत शिवगर्जना यात्रेसाठी कोल्हापुरात आले असता जाहीर सभेत पाहायला मिळाला. असे असले तरी आगामी काळात चंद्रदीप नरके यांना काटे की टक्कर देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून चाचपणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू डॉ. चेतन नरके यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. डॉ. चेतन नरके हे कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. यासाठी ते महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची सातत्याने भेटी गाटी ही घेत आहेत. गेल्या महिन्यात कोल्हापूर येथे इंडियन डेअरी फेस्टिवलचे आयोजन करून राज्यातील नेत्यांना त्यांनी आमंत्रण दिले होते. महाविकास आघाडीसह इतर पक्षातील बऱ्याच नेत्यांनी त्याला हजेरी लावली होती. तर डॉ चेतन नरके आणि आदित्य ठाकरे यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
डॉ. चेतन नरके हे गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके यांचे सुपुत्र असून सहकार, बँकिंग, दुग्ध व्यवसाय, शेतकरी यासह सर्व घटकांची माहिती असणारा अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहे. चेतन नरके यांच्याकडे अभ्यास वृत्ती आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वीच कुबी कासारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या विरोधात त्यांनी जोरदार प्रचार करत विरोधी गटाला पाठिंबा दिला.मात्र असे असले तरी चंद्रदीप नरके यांनी एक हाती सत्ता मिळवली मात्र ते त्यावेळी महाविकास आघाडी सोबत होते.मात्र आता ते शिंदे गटात गेल्याने शिवसैनिक देखील त्यांच्या विरोधात नाराज झाले आहेत तर खासदार संजय राऊत यांनी देखील चंद्रदीप नरके हे टेस्ट ट्यूब बेबी आहेत त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली. असे असले तरी निवडणुकीत ठाकरे गटाकडून नरके घराण्यातीलच त्यांचे भाऊ आणि विरोधक डॉ. चेतन नरके यांची चाचपणी होत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र माझ्या कन्येचा नामकरण सोहळा होता आणि त्यामुळे हि वैयक्तिक आणि कौटुंबिक भेट होती असे चेतन नरके म्हणाले आहेत.मात्र या भेटीला अनेक अर्थ लावले जात असून येत्या काळात कोल्हापुरात नवीन राजकीय समीकरण पहावयास मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
0 Comments