सातारा: संजय राऊत यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे व शिवसेना त्यांचीच आहे असं म्हणण्याचा प्रयत्न करू नये. संजय राऊताच्या नादाला उद्धव ठाकरे लागल्यामुळे चाळीस आमदार बाजूला गेले आहेत. आता हे उर्वरित पंधरा आमदार उद्धव ठाकरे साहेबांना सोबत ठेवायचे असतील, तर त्यांनी यातूनही बोध घ्यावा आणि संजय राऊतांपासून सुरक्षित अंतर ठेवून राहावं, असा सल्ला राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिला आहे. शिवगर्जना मेळावा शुक्रवारी साताऱ्यातील पालिकेच्या शाहू कला मंदिरात आयोजित केला होता. त्यावेळी शंभूराज देसाईंवर टीका करताना राऊत म्हणाले होते, की पाटणचे पापाचे पित्तर शंभू की चंभु... शिवसेना नसती तर त्यांना मंत्री पदही मिळाले नसते. या टीकेला उत्तर देण्यासाठी आज मंत्री शंभूराजे देसाई यांनी कराड येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती.
शिवसेना व धनुष्यबाण हे चिन्ह कायद्याने आम्हा शिंदे गटाला मिळाले आहे. त्यामुळे त्यांना ठाकरे गटाला शिवसेना नाव वापरता येणार नाही. त्यामुळे आम्ही म्हटलं उद्धव ठाकरे गट राहिल. त्यात काय चुकलं आहे. खरं बोललं की झोंबत. त्यांनी कितीही खालच्या थरावर जाऊन आमच्यावर टीका केल्या, तरी आम्ही खालच्या थरावर जाऊन टीका करणार नाही. आम्ही कामातून त्यांना उत्तर देऊ, पत्रकारांच्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिले. माननीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही शिवसेनेमध्ये काम करतोय. ते आज हयात नसले तरी त्यांचं स्मरण करून त्यांचं नाव घेऊन काम करत असतो. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मला मंत्रिपद मिळालं ही वस्तुस्थिती आहे.
पाटण मतदारसंघातून तीन वेळा 7 हजार, 14 हजार, 18 हजार मतांनी निवडून आलो आहे. संजय राऊत यांनी मला काही म्हणण्याच्या अगोदर त्यांनी ग्रामपंचायत वार्ड, नगरपालिका वार्डातून निवडून येऊन दाखवावे आणि नंतर चार- चार लाख मतदार असलेल्या मतदारसंघातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या बाबत अशी बेताल विधाने करावीत. ते आमच्या मतांवर राज्यसभेचे खासदार झालेले आहेत. त्यांच्या हिम्मत असेल तर आमच्या मतांवर निवडून आलेल्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा राज्यसभेवर निवडून येवून दाखवावे. त्यांच्या सुरू असलेली या वाचाळ बडबडीला आम्ही फारसं महत्त्व देत नाही, असे आव्हान करून खोचक टोमणाही मारला.
0 Comments